
परभणी, 05 मार्च (हिं.स.)।
पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरण परिसरातील अत्यंत अरुंद व धोकादायक पुलावरून पिकअप वाहन नदीपात्रात कोसळून 31 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंकुश शिंदे जालना येथून पिकअप वाहनाने आपल्या गावाकडे निघाले होते. येलदरी येथील अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि पिकअप थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळली. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीपात्रात मोठा प्रवाह होता. वाहन पाण्यात पडल्यानंतर काही काळ पुलालगत अडकले; मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही.
ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने तत्काळ कोणाच्याही निदर्शनास आली नाही. पुलावरून ये-जा करणार्या नागरिकांना नदीपात्रात वाहन दिसल्यानंतर अपघात उघडकीस आला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis