
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)। येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित काॅरिडाॅरचा मुद्दा पुन्हा चर्चेचा सुरु विषय झाला आहे. राज्य सरकारने काॅरिडाॅर करण्याच्या हालचाली सुरु केल्यानंतर बाधित दुकानदार आणि रहिवाशांनी त्याला विरोध केला आहे. याच मुद्द्यावरुन आता राजकीय धुळवड सुरु झाली आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी बाधितांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होत काॅरिडाॅर चंद्रभागानदीच्या पलीकडे ( शेगाव दुमाला परिसर ) तयार करावा अशी मागणी केली आहे. तर आमदार समाधन आवताडे यांनी आमदार पाटील यांनी एकदा वारी काळात विठ्ठल मंदिर परिसरात चालत प्रदक्षिणा पूर्ण करावी असा सल्ला दिला आहे. दोन आमदारांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे काॅरिडाॅरच्या मुद्द्याचे राजकारण होत असल्याने बाधितांमधून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे. लाखाे भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या विठुरायाचे सुलभ दर्शन व्हावे, येणार्या भाविकांची चांगली सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने उज्जैन व काशीच्या धर्तीवर काॅरिडाॅर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे स्वतः आग्रही आहेत. त्यामुळे शासन पातळीवर काॅरिडाॅर तयार करण्याबाबत जोरदार हालीचाली सुरु आहेत. अलीकडेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने काॅरिडाॅरला मंजुरी दिली आहे. येत्या आधिवेशनामध्ये काॅरिडाॅरच्या कामासाठी निधीची तरतूद देखील केली जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड