
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.) -
पंढरपूर तालुक्यातील खरातवाडी येथे अवैध मुरूम उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महिला वन अधिकारी शीतल चाटे यांच्या अंगावर टिप्पर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू तस्करांना तडीपार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आ. समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा परिसरातील वाढत्या तस्करांच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात मांडला. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, महिला अधिकाऱ्यांवरील हल्ला ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल केले असून वन कायद्यानुसारही संशयितांवर कारवाई सुरू आहे.
तस्करांवर वचक बसवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मंत्री बावनकुळे म्हणाले की, आता ड्रोन मॅपिंग प्रणाली विकसित केली जात आहे. ज्या ठिकाणी उत्खनन सुरू असेल, तिथे ड्रोनद्वारे सर्वेक्षण आणि गुगल मॅपच्या आधारे देखरेख केली जाईल. यामुळे अवैध उत्खनन आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होईल. अवैध उत्खननाच्या मागे मोठे रॅकेट कार्यरत असले तरी, आता पोलीस, महसूल आणि वन विभाग एकत्रितपणे ताकदीने या माफियांवर तुटून पडतील, असा विश्वासही महसूल मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड