आता प्रशासन करणार नागरिकांचे समाधान
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)। राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना सेतूचे दाखले देण्यापासून ते शासनाच्या विवि
आता प्रशासन करणार नागरिकांचे समाधान


सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)।

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना सेतूचे दाखले देण्यापासून ते शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार असल्याची माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी पत्रकारांना दिली.

समाधान शिबिराच्या माध्यमातून मंडल स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात नागरिकांना उत्पन्न, जात आदी प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. याशिवाय सातबाराचे वाचन करुन जिवंत सातबारा उपक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी गरज असलेल्या कुटुंबांना नवीन रेशनकार्डही वितरीत करण्यात येणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना यावेळी लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याचीही तपासणी करण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालय, बँका, सहकार विभाग, कृषी विभाग आदी विभागांच्या योजनांचा लाभ यावेळी पात्र लाभार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande