
सोलापूर, 05 मार्च (हिं.स.)उजनी धरणात सध्या ९७ टीएमसी पाणी आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या धरणात सहा टीएमसी पाणी अधिक आहे. गतवर्षी डिसेंबर व फेब्रुवारीत पाणी सोडावे लागले होते, पण यंदा १७ जानेवारीपासून पाणी सोडण्यात आले. दुसरीकडे सोलापूर शहरासाठी देखील नदीतून पाणी सोडावे लागले नाही. आता उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दोनदा पाणी मिळणार असून पहिले आवर्तन २० मार्चनंतर सोडले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींसह, सोलापूर शहर, कर्जत, इंदापूर, धाराशिव या शहरांची तहान उजनी धरणावरच भागते. उजनी धरणावर ४२ पाणीपुरवठा योजना अवंलबून असून त्यासाठी दोन-अडीच महिन्याला एक टीएमसी पाणी लागते. दरम्यान, सोलापूर शहरासाठी आता १७० एमएलडी क्षमतेची समांतर जलवाहिनी झाल्याने अडीच-तीन महिन्याला भीमा नदीतून सोडावे लागणारे पाणी बंद झाले आहे. सोलापूर शहरासाठी नदीतून दरवर्षी चार आवर्तनातून १८ ते २० टीएमसी पाणी सोडावे लागत होते. आता सोलापूर शहरासाठी नव्हे पण नदी काठावरील गावे, जनावरांसाठी भीमेतून आणखी एकदा पाणी सोडले जाईल. त्यामुळे पाण्याची बचत होऊन यंदा पावसाळा सुरु होईपर्यंत धरणातील साठा उणे होणार नाही, असे अधिकारी सांगतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड