
सोलापूर, 05 मार्च, (हिं.स.) - सोलापूर जिल्ह्यातील बचतगटांना २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुमारे ३०० कोटींचे कर्जवाटप होणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून पुढील महिन्यात कर्जवाटपाचे उद्दिष्ट्य प्राप्त होणार आहे. दरम्यान, गतवर्षी बचतगटांना बॅंकांकडून ३४० कोटींचे कर्जवाटप झाल्याचे ‘उमेद’चे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात २४ हजार २०० बचतगट असून त्याअंतर्गत अडीच लाख महिला जोडलेल्या आहेत. ‘उमेद’च्या माध्यमातून बचतगटातील महिलांना वेळोवेळी आर्थिक मदत झाली आहे. त्यातून सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे एक लाख कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे. दरवर्षी बचतगटातील महिला ‘उमेद’च्या मदतीने बॅंकांकडून कर्ज घेतात आणि त्याची नियमित परतफेड देखील करतात. ३० हजारांवर महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले असून त्यातून अनेकांचे ब्रॅंण्ड तयार झाले आहेत. रूक्मिणी महोत्सव असो की राज्य शासनाच्या माध्यमातून मोठमोठे महोत्सव, त्यात बचतगटातील उद्योजक महिला सहभागी होतात. त्यातून त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड