
पुणे, 07 मार्च (हिं.स.)। अमेरिका- इस्राईल आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धाच्या ज्वाळा आता थेट देशातील साखर उद्योगापर्यंत पोचल्या आहेत. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून, निर्यातीचे मार्गच अनिश्चिततेच्या धुक्यात हरवले आहेत. वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आधीच मंदावलेली साखर निर्यात जवळपास ठप्प झाली आहे.परिणामी देशांतर्गत बाजारात तब्बल १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा फटका साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.साखरेच्या हंगामात देशभरात सुमारे २९५ ते ३०० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा दर सुमारे तीन हजार ६०० ते तीन हजार ७०० रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे.मागील वर्षी हा दर सुमारे चार हजार ५०० रुपयांपर्यंत गेला होता. त्यावेळीही सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता. मात्र, प्रत्यक्षात सुमारे आठ लाख टन साखरच निर्यात झाली. त्यानंतर काही साखर कारखान्यांना शेवटच्या टप्प्यात कमी दराने साखर विकावी लागली होती.यावर्षी निर्यात कोटा वाढवून २० लाख टन करण्यात आला असला तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीत युद्धामुळे मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साखरेचा पुरवठा वाढल्यामुळे दरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु