
परभणी, 07 मार्च (हिं.स.)।
सोरायसिससारख्या दीर्घकालीन त्वचारोगावर प्रभावी उपचार मिळणे रुग्णांसाठी मोठे आव्हान ठरत असते. मात्र आता परभणीतील आर. पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक PUVA थेरेपी (फोटोथेरेपी) सुरू करण्यात आली असून त्यामुळे सोरायसिस रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली आहे. दैठणा येथील एका दीर्घकालीन सोरायसिस रुग्णावर डॉ. मनीष कदम, डॉ. दिनेश भुतडा आणि डॉ. रेवती यांच्या मार्गदर्शनाखाली PUVA थेरेपीचा यशस्वी वापर करण्यात आला. लाईट थेरेपीसह योग्य औषधोपचार केल्यानंतर रुग्णाचा आजार पूर्णपणे नियंत्रणात आला असून उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णाच्या त्वचेवरील लालसर, जाड व पांढऱ्या खवलेदार डाग पूर्णपणे नाहीसे झाल्याने त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा संसर्गजन्य नसलेला त्वचारोग आहे. या आजारामध्ये त्वचेवर लालसर, जाड आणि पांढऱ्या खवल्यांनी झाकलेले डाग दिसून येतात. हा ऑटोइम्यून प्रकारातील आजार असून काही वेळा तो सांधेदुखीपर्यंत (Psoriatic Arthritis) वाढू शकतो. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो.PUVA थेरेपी कशी कार्य करते? PUVA (Psoralen + Ultraviolet A) ही सोरायसिससाठी अत्यंत प्रभावी आधुनिक लाईट थेरेपी मानली जाते. या उपचारपद्धतीत विशेष औषध (Psoralen) दिल्यानंतर UVA किरणांचा वापर करून त्वचेतील पेशींची अनियंत्रित वाढ कमी केली जाते. परभणीत ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज भासणार नाही. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, “आर. पी. हॉस्पिटलमध्ये त्वचारोग विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. PUVA थेरेपीसारख्या अत्याधुनिक उपचारांमुळे सोरायसिससारख्या दीर्घकालीन आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य आहे.”ग्रामीण भागातील रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील आणि अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis