सिंधुदुर्ग : उज्ज्वला धानजी यांनी लिहिलेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर पुस्तकाचे प्रकाशन
सिंधुदुर्ग, 7 मार्च, (हिं. स.) | बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन कणकवलीत नीलम कंट्रीसा
उज्ज्वला धानजी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन


सिंधुदुर्ग, 7 मार्च, (हिं. स.) | बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन कणकवलीत नीलम कंट्रीसाइड येथे झाले.

एआयबीइए-कोल्हापूर झोनचे संतोष रानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मान्यवर म्हणून प्रसाद घाणेकर, निवृत्त भारतीय स्टेट बँक अधिकारी एकनाथ वायंगणकर, माजी शिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, जिल्हा बँक संचलिका प्रज्ञा प्रदीप ढवण, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आणि धानजी कुटुंबीयप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक द. शि. हिर्लेकर गुरुजी यांनी वृक्षपूजन करून समारंभाचे उद्घाटन केले. संगीतज्ञ माधव गावकर यांनी सुश्राव्य शारदास्तवन म्हटले. प्रसाद घाणेकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक एक प्रकारचे देखणे आत्मचरित्रच झाले असून त्यांच्या आयुष्याचा प्रवास पाहता ते एक व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शकच पुस्तक ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. कणकवलीच्या विघ्नेश पुस्तक भांडाराने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

उज्ज्वलाच्या मनात एखादी गोष्ट करावी असे आले की ते करण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत आणि जिद्द लहानपणापासूनच आम्ही बघत आल्यामुळे आजचे पुस्तक ही त्याची फलश्रुती आहे आणि त्याने आम्ही खूप आनंदित झालो आहोत, असे एकनाथ वायंगणकर काका यांनी सांगितले. रामचंद्र आंगणे यांनी सांगितले की, सौ. धानजी बँकेत नोकरी करत असल्या तरी त्यांचा कोकण मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला या संस्थांतील साहित्यिक सहभाग नेहमीच लक्षणीय आणि मनोवेधक असायचा. कोरोना काळातील शंभरच्या वर ऑनलाइन कार्यक्रमातील लेखिकेचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

अध्यक्षस्थानावरून रानडे सर म्हणाले की, ऐंशीच्या दशकात एसएससीला विशेष प्रावीण्य श्रेणी मिळूनसुद्धा विज्ञान शाखेकडे न वळता कला शाखेकडे प्रवेश घेऊन लेखिकेने आपले साहित्यप्रेम खरे तर त्या टप्प्यावरच नक्की केले होते. विवाहोत्तर आयुष्यात आणि बँकिंग सेवेत स्थिरस्थावर झाल्यानंतर अंतरंगात जपून ठेवलेले साहित्य आणि त्याचे वेगवेगळे पैलू लेखिकेने आचरणात आणले. सूत्रसंचालन, काव्य, कथा, साहित्य अशा अनेक मार्गाने लेखिका साहित्यसेवा करीत आहे.

लेखिकेला समजून घेताना या सुंदर मुलाखतीचे संवादकर्ते प्रसाद घाणेकर यांनी कौटुंबिक क्षेत्रातील वावरासाठी चंद्रशेखर धानजी, तर बँकिंग क्षेत्रातील वावरासाठी पूर्वा मराठे आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील वावरासाठी आरती वायंगणकर यांच्याशी संवाद साधून कार्यक्रमात अधिकच रंग भरला.

सुरेश ठाकूर गुरुजी यांनी पुस्तकाची निर्मितीविषयी प्रकट मुलाखत घेतली. पुस्तकाच्या निर्मितीत माझा एकटीचा सहभाग नसून माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व कर्मचारी, मित्र-मैत्रिणी, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक, सासर-माहेराकडून वेळोवेळी मिळालेल्या शुभेच्छा, प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केल्यामुळेच ही अक्षरसेवा माझ्या हातून घडली असे आपले साहित्यऋण त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैष्णवी शिवम धानजी यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande