
रायगड, 07 मार्च (हिं.स.)। अलिबाग : लोकशाही व्यवस्थेत नागरिक हा केंद्रबिंदू असून त्यांचे जीवन अधिक सुलभ आणि सुखकर करणे हे शासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. याच उद्देशाने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत असून याद्वारे प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जात आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील सारळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित ‘महाराजस्व समाधान शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खारगे म्हणाले की, हा उपक्रम केवळ एका भागापुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व ३५८ तालुक्यांतील प्रत्येक महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. दर तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक तालुक्यातील सहा महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची शिबिरे घेण्यात येणार असून एकही पात्र नागरिक शासकीय लाभापासून वंचित राहू नये, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
कार्यक्रमात बोलताना शिवाजी चौरे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी समन्वयाने काम करतात, त्या ठिकाणी विकासकामांना गती मिळते. या अभियानात लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असून त्यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांचा विश्वास वाढण्यास मदत होत आहे.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना सांगितले की, महसूल विभाग हा केवळ एक विभाग नसून सर्व शासकीय विभागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांना विविध दाखले, परवाने तसेच शासनाच्या योजनांचा लाभ सुलभ आणि विनाविलंब मिळावा, हा या समाधान शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्न दाखले आणि रहिवासी दाखले यांचे थेट वाटप करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन अर्जही स्वीकारण्यात आले. नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार विक्रम पाटील, गट विकास अधिकारी शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, रेवस ग्रामपंचायतीचे सरपंच मच्छिंद्र पाटील तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. सारळ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)