
रायगड, 07 मार्च, (हिं.स.)। आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि गौरवशाली इतिहास हे त्या समाजाचे खरे सामर्थ्य आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करत निसर्गाशी नाते जपणाऱ्या आदिवासी समाजाच्या परंपरांचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आदिवासी विकास परिषद’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पेण येथे पार पडलेल्या या परिषदेला आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, आदिवासी समाज अत्यंत नम्र, प्रामाणिक आणि विश्वासू आहे. त्यांच्या भावना आणि गरजा समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी थेट वाड्या-वस्त्यांवर जाऊन संवाद साधणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग हा या समाजाच्या उन्नतीसाठीच कार्यरत असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील आदिवासी, ठाकर आणि कातकरी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आदिवासी वाड्यांमधील मुले अत्यंत जिद्दी आणि कणखर असतात. ‘अमृता आहार’ योजनेच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू असून सुधागड–पाली तालुक्यात आदिवासी विभागाचे स्वतंत्र संकुल उभारण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, आदिवासी विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात तब्बल २१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दुर्गम वाड्यांमध्ये रस्ते, पाणी, सभागृह यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन त्या भागांचा विकास करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी आदिवासी बांधवांनी उभारलेल्या हस्तकला व पारंपरिक वस्तूंच्या स्टॉल्सना भेट देत त्यांचे कौतुक केले. पारंपरिक आदिवासी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला बचत गटांना विविध योजनांचे धनादेश देण्यात आले तसेच गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
या परिषदेला खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, पद्मश्री परशुराम गंगावणे, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम आणि प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी विभागाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)