
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित मागण्यांसाठी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्णयानुसार बिलोली उपविभागीय भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले असल्याने सर्व कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.
तांत्रिक वेतनश्रेणीच्या मुख्य मागणीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून, यावेळी मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाहीच, असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रलंबित मागण्यांवरून शासनाकडून केवळ 'वेळकाढूपणा' सुरू असल्याचा आरोप कर्मचारी संघटना च्या वतीने केला आहे.
या आंदोलनाच्या मागण्यांचा चेंडू शासनाच्या कोर्टात आहे. यावर तोडगा निघले नाही तर लाखो मोजणी प्रकरणे प्रलंबित राहू शकतात त्यामुळे शासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागण्यांचे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळे तसेच सचिव यांना देण्यात आले आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले
कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची पद्धत बंद करणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र रोव्हर, लॅपटॉप आणि डेटा कार्ड पुरवणे, जेणेकरून कामात सुसूत्रता येईल, ई-मोजणी व्हर्जन २ हे सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी फ्रेंडली करणे, सुटीच्या दिवशी कामकाज न करण्याबाबत स्पष्ट सूचना देणे.
गेल्या १३ वर्षांपासून तांत्रिक वेतनाची प्रतीक्षा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपली व्यथा मांडली. आजवर अनेक संप झाले, पण यावेळी निर्माण झालेली एकजूट अभूतपूर्व आहे. अर्ध्या वाटेवरून माघार घेतली तर आपल्या पदरी काहीच पडणार नाही. असे सांगत संपात सहभागी न होणाऱ्या किंवा दुहेरी भूमिका घेणाऱ्या सहकाऱ्यांना इतिहास घडवणा-यांमध्ये तुमची गणना होऊ द्या, फुट पाडू देऊ नका असे आवाहन केले राज्यातील महसूल मंत्र्यांसोबत ४ जून २०२५ रोजी झालेल्या बैठकीत १५०
दिवसांच्या आत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हा कालावधी उलटून तीन महिने झाले. तरीपण अद्यापही तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन चालू असून यामुळे बिलोली येथील उपविभागीय भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याने नागरिक कामांसाठी हेलपाटे मारताना दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis