
म, 07 मार्च (हिं.स.)।
देगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील योगेश्वर गोविंद पांचाळ या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर कोणतेही यश दूर नसते, हे योगेश्वर पांचाळ यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.महाराष्ट्र राजपत्रित गट-ब अंतर्गत घेण्यात आलेल्या २०२४ च्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत योगेश्वर पांचाळ यांनी राज्यातून १३३ वी रँक मिळवत हे यश संपादन केले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे.योगेश्वर हे यापूर्वीपासून बँकिंगसह विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. काही अडचणी असूनही त्यांनी खचून न जाता अभ्यास सुरूच ठेवला. २०२३ साली त्यांची रेल्वेमध्ये ट्रॅक मेंटेनर म्हणून नियुक्ती झाली. नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात खंड पडू दिला नाही. मुख्य परीक्षेच्या काळातही ड्युटी सांभाळत त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्याचे फळ म्हणून गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाल्याचे स्पष्ट झाले.निकाल जाहीर झाल्यानंतर योगेश्वर यांनी ही आनंदाची बातमी आपला मोठा भाऊ अमर पांचाळ तसेच आई-वडिलांना दिली. त्यानंतर मित्रपरिवार आणि गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड