
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर)
कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून पुढील टप्प्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही लवकरच तो राबविण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली. सध्याच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सन २००२ मधील विशेष पुनरिक्षणाच्या अंतिम मतदारयादीशी जुळवून पाहण्याची (मॅपिंग) कार्यवाही केली जाणार आहे. प्रारंभी मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत 'टेबल-टॉप अॅक्टिव्हिटी'द्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात सन २००२ मधील अंतिम मतदारयादी आणि सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम मतदारयादीचा परस्पर ताळमेळ घालत 'वन-टू-वन'
पद्धतीने नोंदींचे मॅपिंग केले जाणार आहे. दरम्यान, ज्या नोंदींचे 'वन-टू-वन' मॅपिंग शक्य होणार नाही, त्यासाठी 'प्रोजेनी मॅपिंग' पद्धत अवलंबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पद्धतीत सन २०२४ च्या मतदारयादीतील ज्यांची नावे सन २००२ च्या यादीत आढळत नाहीत, अशा मतदारांच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांची नावे सन २००२ च्या मतदारयादीत शोधून त्याआधारे नोंदींचे मॅपिंग केले जाणार आहे.
ही कार्यवाही अचूक आणि काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे तपासून नोंदींची पडताळणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रविण मेगंशट्टे, तहसीलदार विनोद गुंडमवार, नायब तहसीलदार रामेश्वर सावते, नगराध्यक्ष भगवान दंडवे, उपनगराध्यक्ष दिलीप सोनवडे, यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis