
रायगड, 07 मार्च (हिं.स.)। अलिबाग वनविभागात कार्यरत असलेले वनरक्षक सुरज सारंगे यांचा शुक्रवारी (दि. ६) रात्री दुर्दैवी रस्ता अपघातात मृत्यू झाला. रेवस–रेड्डी मार्गावर खोदून ठेवलेल्या मोरीत त्यांची मोटारसायकल पडल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेमुळे वनविभागात शोककळा पसरली असून संबंधित प्राधिकरण व कंत्राटदारांच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सारंगे हे अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या मुरूड तालुक्यातील सर्व्हे येथील घरी मोटारसायकलवरून जात होते. रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामासाठी रस्त्यात मोरी खोदून ठेवण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे अंधारात सारंगे यांना खड्डा दिसला नाही आणि त्यांची मोटारसायकल थेट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेला विशेष वेदनादायी बाजूही आहे. काही दिवसांपूर्वीच सारंगे यांच्या घरी जुळे अपत्य जन्माला आले होते. शुक्रवारीच ही दोन्ही बाळे हॉस्पिटलमधून घरी आली होती. या आनंदाचा क्षण त्यांनी आपल्या मोबाईलच्या स्टेटसद्वारे व्यक्त केला होता. मात्र आनंदाच्या वातावरणात असतानाच नियतीने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, रेवस–रेड्डी मार्गावरील कामादरम्यान खोदून ठेवलेल्या खड्ड्याजवळ कोणतेही बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या किंवा रात्री स्पष्ट दिसण्यासाठी लाल दिवे लावलेले नसल्याचे समोर आले आहे. या निष्काळजीपणाबाबत महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना, शाखा अलिबागचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार प्राधिकरण व कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)