
पुणे, 07 मार्च (हिं.स.)। पुणे मेट्रो टप्पा-2 खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड आणि रामवाडी ते वाघोली या तीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. यामुळे शहरातील मेट्रोमार्गांबरोबर आता शहराबाहेरही मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांची कोंडीतून सुटका होण्यासाठी फायदा होणार आहे.
हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून, त्यामध्ये एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहेत. या दोन्ही उपमार्गिका पूर्णत: उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रोमार्फत करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबरोबरच पुणे मेट्रोचे जाळे पूर्वेकडे आणखी विस्तारित होणार आहे.
शहराच्या पूर्व परिसरासह ग्रामीण भागालाही मेट्रो सेवेचा लाभ मिळणार आहे. तसेच हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे मल्टिलेव्हल इंटेग्रेशन करून पार्किंग सुविधा निर्माण करण्याचे नियोजन आहे. आता हडपसर बस डेपो ते सासवड रोडपर्यंत राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याने मेट्रोचे जाळे आणखी भक्कम होणार आहे, तसेच थेट सासवडपर्यंत मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच, राज्यातील मेट्रो नेटवर्क 1200 कि.मी.पर्यंत नेण्याचे नियोजन देखील केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु