
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)। महसूल विभागाच्या विविध सेवा व नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तहसील कार्यालय, कंधारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर (टप्पा- १) या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महसूल विभागाच्या विविध योजना व सेवा नागरिकांना एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे.
या अभियानांतर्गत कंधार तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात बारूळ मंडळातून झाली. बारूळ मडळातील सर्व सज्जातील गावांतील शेतकरी व नागरिकांनी या शिबिराचा लाभघ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पुढील शिबिरही विविध मंडळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार दि.१४ मार्च रोजी दिग्रस बु मंडळ, दि.१० एप्रिल रोजी फुलवळ मंडळ, दि. १७ एप्रिल रोजी पेठवडज मंडळ, दि. २४ एप्रिल रोजी कुरुळा मंडळ, दि. ३० एप्रिल रोजी उस्माननगर मंडळ, तसेच दि.८ मे रोजी कंधार मंडळ येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभमिळणार आहे. त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली, ७/१२ उताऱ्यातील चुकांची दुरूस्ती, डीजीटल स्वाक्षरीसह ७/१२ उतारा, ८ अ उताऱ्याचे वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, अकृषीक परवानगी व मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय योजनांचे लाभमंजूर, विद्यार्थी आवश्यक दाखले, पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणे, घरांसाठी पट्टे वाटप यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरांचे आयोजन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कंधार तालुक्यातील सर्व गावांतील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपरोक्त दिवशी संबंधित मंडळात उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभघ्यावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis