
नांदेड, 07 मार्च (हिं.स.)।
मुदखेड शहरातील सार्वजनिक क्रीडा संकुल /स्टेडियमला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, मुदखेड असे अधिकृत नामकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी, नगर परिषद मुदखेड यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुदखेड हे तालुक्यातील एक प्रमुख शैक्षणिक व क्रीडा केंद्र असून येथे दररोज हजारो तरुण खेळाडू सरावासाठी येतात तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजनही केले जाते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला केवळ संविधानच दिले नाही, तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देत तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांमुळे शिस्त, जिद्द आणि संघर्षाची भावना बळकट होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. मुदखेड येथील क्रीडा संकुलाला डॉ. आंबेडकर यांचे नाव दिल्यास येथील खेळाडूंना व भावी पिढीला प्रेरणा मिळेल व शहरासाठी तो अभिमानाचा विषय ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
सार्वजनिक क्रीडा संकुलाचे अधिकृत नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, मुदखेड असे करण्यात यावे. नगर परिषदेकडील सर्वसाधारण सभेत नामकरणाचा ठराव मंजूर करण्यात यावा.
स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक सन्मानपूर्वक लावण्यात यावा.
प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनातून कुणाल देविदासराव चौदंते यांच्या वतीने सादर करण्यात आली असून प्रत माहितीसाठी आमदार श्रीजयताई चव्हाण यांनाही देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis