
सोलापूर, 07 मार्च (हिं.स.)। सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडलाधिकाऱ्याच्या खासगी चालकाला ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मंडलाधिकारी विजया नाईक (रा. इसबावी, ता. पंढरपूर) व त्यांचा खासगी चालक वैभव मोरे (रा. मुंढेवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार विनोद सीताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून सातबारा उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी नाईक यांच्या वतीने १० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड