
लातूर, 07 मार्च (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्य मानून लातूर पोलीस दल सातत्याने कार्यरत आहे. रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी तसेच नागरिकांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा शहराजवळील ओव्हरब्रिज परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.
दिनांक 05 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10.00 वाजण्याच्या सुमारास याच परिसरात कार व मालवाहू आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेची तात्काळ दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अपघातस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली व भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान त्यांनी महामार्गावरील रस्त्याची रचना, वळणाची स्थिती, वाहनांचा वेग, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक फलक तसेच वाहतूक नियंत्रण यांसारख्या विविध बाबींचा बारकाईने पाहणी करून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संभाव्य त्रुटी दूर करण्यासाठी तसेच वाहनचालकांना स्पष्ट मार्गदर्शन मिळावे यासाठी योग्य दिशादर्शक फलक, वेग मर्यादा सूचना, प्रकाश व्यवस्था सुधारणा व वाहतूक नियंत्रण यांसारख्या उपाययोजना संबंधित विभागाकडून तातडीने करून घेणे बाबत निर्देश देण्यात आले.
लातूर पोलीस दल केवळ गुन्हेगारी नियंत्रणापुरते मर्यादित नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेबाबतही तेवढ्याच संवेदनशीलतेने कार्य करत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितींची वेळोवेळी दखल घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी लातूर पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जाते.
या प्रसंगी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी संपूर्ण लातूर जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्रांचा (ब्लॅक स्पॉट) शोध घेण्याबाबतही महत्त्वाचे निर्देश दिले. जिल्ह्यात ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत अशा सर्व ठिकाणांची माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करावा व तो संबंधित विभागांकडे पाठवून त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा, असे आदेश सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
या अनुषंगाने लवकरच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपघातप्रवण ठिकाणांचा सविस्तर अहवाल तयार करून संबंधित शासकीय विभागांकडे सादर करण्यात येणार असून त्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती, सुरक्षा उपाययोजना व वाहतूक व्यवस्थापन सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
लातूर पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी नेहमीच तत्पर असून रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळातही प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनीही महामार्गावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, वेग मर्यादा पाळणे, तसेच सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याने सर्व वाहनचालकांनी जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis