
सोलापूर, 07 मार्च, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बॅंकेचे २४ हजार शेतकरी थकबाकीत असून त्यांच्याकडे ३६२ कोटी रुपयांची थकबाकी आहे. दुसरीकडे सुमारे ९० हजार शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करणारे आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनुसार सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सुमारे एक लाख शेतकऱ्यांना (नियमित कर्जदार व थकबाकीदार) कर्जमाफीचा लाभ होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. बॅंकेला आता कर्जमाफीच्या निकषांची प्रतीक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. दुसरीकडे, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडील २४ हजार थकबाकीदारांमध्ये पाच वर्षांपूर्वीचेच सर्वाधिक थकबाकीदार आहेत. ही कर्जमाफी केवळ पीककर्जासाठी असल्याने ज्यांचे पीककर्ज थकीत आहे, त्यांनाच दोन लाख रुपयांची माफी मिळणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त पीककर्ज असेल तर वरची रक्कम शेतकऱ्यांना प्रथम बॅंकेला भरावी लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड