
नांदेड, 07 मार्च, (हिं.स.)। नांदेड शहरातील वाढती वाहतूक कोंडी व नियमभंग करणाऱ्या वाहनांवर आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांनी विशेष मोहीम राबवत अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना चालणारी वाहने, ट्रिपल सीट व इतर नियमभंग करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत एकूण 149 केसेस केल्या. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी शहरात वाढत असलेल्या ट्राफिक समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना किंवा परमिटवर चालणारी वाहने, भरधाव वेगाने धावणारी वाहने तसेच फटाका बुलेटवर कारवाई करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखा वजिराबाद यांना दिले होते. या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी स्टाफसह रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर, वर्कशॉप, राज कॉर्नर व छत्रपती चौक या
ठिकाणी वाहनांची कागदपत्रे तपासणी केली. यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, ट्रिपल सीट, विना परवाना वाहनचालक तसेच इतर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करून एकूण 149 केसेस करण्यात आल्या. तसेच ऑटो चालकांना गणवेश परिधान करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. वाढत्या ट्राफिकच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी चारचाकी व दुचाकी वाहने कुठेही पार्क न करता निर्धारित पार्किंग ठिकाणीच उभी करावीत, सिग्नलचे पालन करावे तसेच रस्त्यावर फळगाडे किंवा इतर अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा वजिराबादच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis