
जळगाव, 07 मार्च (हिं.स.)जळगावच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी तरुणीने तब्बल ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुण बीएससीचे शिक्षण घेत असून तो सध्या नाशिक येथे राहून शिक्षण घेत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये त्याची ओळख फेसबुकवरून एका तरुणीशी झाली. संबंधित तरुणीने त्याला एका लिंकद्वारे Tango अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.अॅप डाउनलोड केल्यानंतर त्या तरुणाची ‘नेहा शर्मा’ नावाच्या महिलेबरोबर ओळख झाली. काही दिवसांनंतर तिने तरुणाला अश्लील व्हिडिओ कॉल करण्यास प्रवृत्त केले. या कॉलचे गुप्तपणे रेकॉर्डिंग करण्यात आले आणि त्यानंतर आरोपींनी स्वतःला दिल्ली सायबर पोलिस असल्याचे सांगत तरुणाला धमकावण्यास सुरुवात केली.रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवून आरोपींनी त्याच्याकडून वेळोवेळी पैसे मागितले. बदनामीच्या भीतीने घाबरलेल्या तरुणाने वडिलांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे पैसे पाठवले. सर्वात कमी ३०० रुपये तर सर्वाधिक २५ हजार रुपये असे एकूण ६४ व्यवहार करून त्याच्याकडून ५ लाख ९५ हजार ४५० रुपये उकळण्यात आले.दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणाने जळगाव सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर