
लातूर, 07 मार्च (हिं.स.)देवणी तालुक्यात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची गंभीर घटना घडताच देवणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत 'ऍक्शन मोड' मध्ये येत झपाट्याने तपास सुरू केला आणि पीडित मुलीचा सुरक्षित शोध लावला. पोलिसांच्या या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला असून परिसरात देवणी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
देवणी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दि. ५ मार्च २०२६ रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी देवणी पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत गुन्हा क्रमांक ५१/२०२६ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १३७ (२) तसेच बीएनएसएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन, तसेच गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण धागेदोऱ्यांच्या आधारे संबंधित अल्पवयीन मुलगी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच देवणी पोलिसांनी तात्काळ अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. अक्कलकोट उत्तर पोलिसांनीही तत्परता दाखवत मंदिर परिसरात शोधमोहीम राबवली आणि संबंधित मुलीस सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर देवणी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार आर. जी. लामतुरे यांनी तात्काळ अक्कलकोट येथे जाऊन मुलीस ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी देवणी येथे आणले.
अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याच्या गंभीर प्रकरणात एवढ्या कमी वेळेत मुलीचा शोध लावण्यात देवणी पोलिसांना मिळालेले यश हे त्यांच्या तत्परता, नियोजनबद्ध तपास आणि अचूक समन्वयाचे उदाहरण मानले जात आहे. पोलिसांनी वेगवान तपास करून संशयिताविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढूमे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. देवणी पोलीस ठाण्याचे सपोनि बी. एस. गायकवाड, पोलीस हवालदार आर. जी. लामतुरे, गोपे तसेच त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत ही मोहीम यशस्वी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. देवणी पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे मुलगी सुरक्षित मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून परिसरात पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis