लातुरात हिंसाचाराचा वाढता आलेख; किरकोळ वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
लातूर, 07 मार्च (हिं.स.)। लातूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृपा सदन रोडवरील एका पान टपरीसमोर
शस्त्रांने हल्ला


लातूर, 07 मार्च (हिं.स.)। लातूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृपा सदन रोडवरील एका पान टपरीसमोर किरकोळ बाचाबाचीवरून हा प्रकार घडला असून, या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

कृपा सदन रोडवरील एका पान टपरीसमोर काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी संतापून धारदार शस्त्राने संबंधित तरुणाच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि गंभीर जखमी झाला.घटनेनंतर जखमी तरुणाला तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (जीएमसी) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच स्वामी विवेकानंद पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून या प्रकरणातील तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस सध्या कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात व्यस्त असल्याने जखमी आणि आरोपींची नावे अधिकृतपणे समजू शकली नाही तर गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरात हिंसक घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. किरकोळ कारणावरून थेट शस्त्रांचा वापर होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्हेगारीचा वाढता आलेख रोखणे आता लातूर पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande