
हिंगोली, 08 मार्च (हिं.स.)।
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कयाधू नदीवरील खरबी येथे सुरू असलेल्या उच्च पातळी बंधारा कामाची तसेच पैनगंगा प्रकल्पातील पाणी तूट भरून काढण्यासाठी प्रगतीपथावर असलेल्या पाणी वहन प्रणालीच्या बोगद्याची प्रत्यक्ष जावून पाहणी केली.
खरबी उच्च पातळी बंधारा व पाणी वहन प्रणालीचे काम पूर्ण झाल्यानंतर या बंधाऱ्यात सुमारे दोन दलघमी पाणीसाठा निर्माण होणार असून, अंदाजे ३०० हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या उच्च पातळी बंधाऱ्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी यावेळी दिली.
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत पैनगंगा नदीवर इसापूर धरण व कयाधू नदीवर सापळी धरण बांधण्याचा प्रस्ताव होता. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सापळा धरण रद्द करण्यात आला. त्यामुळे पैनगंगा प्रकल्पामध्ये सुमारे १९९ दलघमी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी खरबी उच्च पातळी बंधाऱ्यातून पावसाळ्यात इसापूर धरणाकडे पाणी वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कयाधू नदीचा कमाल पुराचा विसर्ग ३०९९.९१ घनमीटर प्रति सेकंद इतका असून, त्यापैकी सुमारे ६० घनमीटर प्रति सेकंद पाणी इसापूर धरणाकडे वळविण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती झाली असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी शेनोडी–रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचाही आढावा घेण्यात आला. या योजनेद्वारे सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणाचे काम तातडीने पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis