

सुपर वुमन बाईल रॅलीने महिला दिन साजरा
छत्रपती संभाजीनगर, 08 मार्च (हिं.स.)।
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांची सुपर वुमन बाईक रॅली काढण्यात आली. क्रांती चौकापासून सुरु झालेल्या या रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झाला.
महिला या शक्तीचे स्वरुप असतात, गरज आहे ती फक्त महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखण्याची, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महिलांचा आत्मविश्वास वाढवला.
क्रांती चौकात महिलांच्या बाईल रॅलीचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, शिक्षणाधिकारी माध्यमिक आश्विनी लाठकर, शिक्षणाधिकरी प्राथमिक जयश्री चव्हाण तसेच प्रशासनातील महिला अधिकारी – कर्मचारी या रॅलीत उत्साहात सहभागी झाल्या. रॅलीत महिला सक्षमीकरणाच्या घोषणांनी परिसर निनादून गेला. पैठण गेट, तापडिया रंगमंदिर मार्ग, महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत औरंगपुरा भाजी मंडी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी स्वामी यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. महिला ह्या समाजाचा निम्मा भाग आहे. त्यांची बुद्धिमत्ता, शक्ती याचा उपयोग झाल्यास आपला समाज अनेक क्षेत्रात आघाडीवर जाईल.त्यासाठी महिलांनी स्वतःच्या क्षमतांना ओळखून त्याचा विकास करायला हवा,असे प्रतिपादन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis