
उन्हाळ्याची झळ तीव्र; वसुंधरा प्रतिष्ठानचा वृक्ष संवर्धनासाठी नवा प्रयोग
लातूर, 01 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून पाण्याच्या टंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. या कडाक्याच्या उष्णतेमुळे केवळ मानवच नव्हे तर झाडेही अक्षरशः लाही लाही होत आहेत. अशा कठीण परिस्थितीत झाडांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानने एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पाण्याअभावी कोमेजत चाललेल्या झाडांना वाचवण्यासाठी प्रतिष्ठानकडून सलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. झाडांच्या मुळाशी सलाईन बाटल्या बांधून हळूहळू पाणी झिरपेल अशी व्यवस्था करण्यात येत आहे. यामुळे झाडांना सतत ओलावा मिळून त्यांचे जगणे सुलभ होत आहे.
या उपक्रमामागे झाडांप्रती असलेली जिव्हाळ्याची भावना आणि पर्यावरण संवर्धनाची तळमळ स्पष्टपणे दिसून येते. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात वृक्षसंवर्धन ही मोठी गरज बनली असताना वसुंधरा प्रतिष्ठानचे हे कार्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उन्हाळ्याच्या या कठीण काळात झाडे जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेशही या उपक्रमातून दिला जात आहे. या उपक्रमात वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे झाडांना पाण्याअभावी मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळील किमान एक झाड दत्तक घेऊन सलाईन पद्धतीने पाणी देण्याचा साधा पण प्रभावी प्रयोग करावा. रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करून झाडांच्या मुळाशी हळूहळू पाणी झिरपेल अशी व्यवस्था करता येते. कमी पाण्यातही झाडे जिवंत राहण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतो. चला, झाडे वाचवण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकूया, असे आवाहन प्रा. योगेश शर्मा यांनी या अनुषंगाने बोलताना केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis