बाजारभावाने दिला दगा; शेतकऱ्याने पाच एकरातील पीक शेळ्या-मेंढ्यांना दिले
बीड, 01 एप्रिल (हिं.स.) : लाखो रुपयांचे भांडवल खर्च करून जोपासलेले ढोबळी मिरची (कॅप्सिकम) पीक बाजारभावाच्या घसरणीमुळे वाया जात असल्याने केज तालुक्यातील एका हतबल शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत पाच एकर उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्याची घटना सम
बाजारभावाने दिला दगा; शेतकऱ्याने पाच एकरातील पीक शेळ्या-मेंढ्यांना दिले


बीड, 01 एप्रिल (हिं.स.) : लाखो रुपयांचे भांडवल खर्च करून जोपासलेले ढोबळी मिरची (कॅप्सिकम) पीक बाजारभावाच्या घसरणीमुळे वाया जात असल्याने केज तालुक्यातील एका हतबल शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेत पाच एकर उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडून दिल्याची घटना समोर आली आहे.

केज तालुक्यातील देशमुख या शेतकऱ्याने मोठ्या जिद्दीने पाच एकरात ढोबळी मिरचीची लागवड केली होती. वेळेवर खते, औषध फवारणी आणि मशागत केल्यामुळे पीक भरघोस आले होते. पांढऱ्याशुभ्र फुलांनंतर हिरव्यागार मिरच्यांनी झाडे लगडली होती. चांगला बाजारभाव मिळेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत ढोबळी मिरचीसह इतर पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सध्या मिरचीला केवळ पाच ते दहा रुपये किलो असा भाव मिळत असल्याने तोडणीचा खर्च आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, मजुरांचे पैसे देणेही कठीण झाले आहे.

या परिस्थितीत लाखो रुपयांचे नुकसान सहन करत असलेल्या देशमुख यांनी अखेर हतबल होऊन उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडण्याचा निर्णय घेतला. ज्या झाडांवरील मिरची तोडून बाजारात पाठवायची होती, ती झाडे आता जनावरांकडूनच नष्ट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरघसरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande