अनियमित वीजपुरवठ्याने मोखाड्यातील व्यवसाय अडचणीत; ‘महावितरण’वर टीका
पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)। मोखाडा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून, विशेषतः लहान व्यावसायिकांचे आर
अनियमित वीजपुरवठ्याने मोखाड्यातील व्यवसाय अडचणीत


पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)।

मोखाडा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून, विशेषतः लहान व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

‘महावितरण’कडून लाइन दुरुस्ती, ब्रेकर बदल यांसारखी कारणे देत डहाणू, सूर्यानगर, गंजाड या भागातून वारंवार वीजपुरवठा बंद केला जातो. मात्र, यासाठी कोणताही निश्चित वेळ नसल्याने नागरिकांना अचानक वीज खंडित होण्याचा सामना करावा लागत आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पेये, पाणी विकणाऱ्या दुकानदारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. वीज नसल्याने शीतपेये थंड राहत नसल्याने विक्रीत मोठी घट झाल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे.

दरम्यान, दुपारच्या वेळेत दररोज दोन ते तीन तास वीज खंडित होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाजही विस्कळीत होत असून, नागरिकांना विविध कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सुरळीत वीजपुरवठा करण्यात ‘महावितरण’ अपयशी ठरत असल्याची टीका होत असून, तातडीने उपाययोजना करून वीजपुरवठा नियमित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande