महालक्ष्मी यात्रेसाठी डहाणूत प्रशासन सज्ज; लाखो भाविकांची अपेक्षा
पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)। डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवी यात्रेला २ एप्रिलपासून प्रारंभ होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या यात्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी ल
महालक्ष्मी यात्रेसाठी डहाणूत प्रशासन सज्ज


पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)।

डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवी यात्रेला २ एप्रिलपासून प्रारंभ होत असून, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या यात्रांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या यात्रेसाठी लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक तसेच गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी या यात्रेला उपस्थित राहतात. सुमारे १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मागील आठवड्यात आढावा बैठक घेत आवश्यक नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे.

यात्रेसाठी व्यापाऱ्यांकडून दुकानांची उभारणी सुरू झाली असून, नियोजित जागेतच दुकाने लावण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. यात्रेत पाळणे, सर्कस, खाद्यपदार्थांची दुकाने, मनोरंजनाचे विविध खेळ आदींची रेलचेल असणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा, दर्शन रांगा, पार्किंग व्यवस्था, वीज सुविधा यावर विशेष भर देण्यात येत आहे. यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande