सदोष सर्वेक्षणामुळे घरकुलापासून वंचित; मोखाड्यात शेकडो कुटुंबांचे हाल
पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)। मोखाडा तालुक्यातील घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली असून, सदोष सर्वेक्षणामुळे शेकडो पात्र लाभार्थी अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत. तालुक्यात २७ ग्रामपंचायती व एक नगरपंचायत असून, नगरपंचायत क्षेत्र वगळता अन
सदोष सर्वेक्षणामुळे घरकुलापासून वंचित


पालघर, 01 एप्रिल (हिं.स.)।

मोखाडा तालुक्यातील घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता समोर आली असून, सदोष सर्वेक्षणामुळे शेकडो पात्र लाभार्थी अद्यापही घरकुलापासून वंचित आहेत. तालुक्यात २७ ग्रामपंचायती व एक नगरपंचायत असून, नगरपंचायत क्षेत्र वगळता अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी चुकीचे सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी आहेत.

घरकुलासाठी प्रस्ताव सादर करून वर्षानुवर्षे लोटले तरी अनेकांना लाभ मिळालेला नाही. काही लाभार्थी तर तब्बल १५ वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. परिणामी, पावसाळ्यात या कुटुंबांना नातेवाईकांच्या आश्रयाला जावे लागते किंवा जीर्ण घरात जीव मुठीत धरून राहावे लागते.

कुलोद येथील पांडुरंग कोती यांनी सांगितले की, “१५ वर्षांपासून घरकुलाची मागणी करत आहे. पावसाळ्यात कुटुंबासह घर सोडून जावे लागते.” अशा अनेक व्यथा तालुक्यात ऐकायला मिळत आहेत.

दरम्यान, सर्वेक्षणात काही ठिकाणी अपात्रांना लाभ देणे, तर पात्रांना चारचाकी वाहन असल्याचे दाखवून वगळणे अशा गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या योजनांना गालबोट लागले आहे.

२०१६ ते २०२५ दरम्यान विविध योजनांतून हजारो घरकुले मंजूर झाली असली तरी अनेक पात्र कुटुंबे अजूनही वंचित आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नव्याने सर्वेक्षण करण्याचे संकेत दिले असून, भूमिहीनांना जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

पात्र लाभार्थी वंचित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande