
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)। शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालाला योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा असताना ऊस, सोयाबीन, कापूस आदी प्रमुख पिकांना अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
उत्पादन खर्च वाढला असताना शेतीमालाच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. उशाला धरण असल्यामुळे तालुक्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ झालेली असुन धरणामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती सिंचनाला पाण्याची उपलब्धता झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक समृद्ध झाला आहे. सध्या बाजारात सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरवर्षी खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरी आणि इंधन यांच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. मात्र, शेतीमालाच्या विक्रीवेळी शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. उस उत्पादक शेतकऱ्यांनाही दराबाबत अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. उसाचे बिल वेळेत मिळत नसल्यासह भाववाढीची प्रतिक्षा वर्षानुवर्षे करावी लागत आहे.
शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमीभाव देण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे. शेतीमालाला शासनाकडून मोठा गाजावाजा करत हमीभाव जाहीर केला जातो. परंतु खरेदी करताना मात्र अनेक अटी, शर्ती घातल्याने शेतकऱ्यांना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis