
रायगड, 01 एप्रिल (हिं.स.)।बदलत्या हवामानामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यातच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात ठप्प झाल्याने आंबा बागायतदार मोठ्या चिंतेत सापडले आहेत. उत्पादनात घट आणि निर्यातीवरील अडथळे यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात कोकणातील हापूस मुंबईच्या बाजारात दाखल होऊन तेथून मोठ्या प्रमाणावर आखाती देशांमध्ये निर्यात केला जातो. दुबईसह आखाती देशांमध्ये सुमारे 40 ते 50 टक्के निर्यात होते. मात्र सध्या सुरू असलेल्या तणावामुळे जलवाहतूक विस्कळीत झाली असून, जेएनपीए बंदरातून होणारी हापूस व मँगो पल्पची निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी स्थानिक बाजारात आंब्याची आवक वाढून दर घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा आंब्याला मोहोर चांगल्या प्रमाणात आला होता. मात्र प्रतिकूल हवामानामुळे तिसऱ्यांदा आलेला मोहोरही करपून गळून पडला. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित उष्णता न मिळाल्याने मोहर योग्य प्रकारे फुलला नाही. त्यातच तुडतुड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा हापूसचे उत्पादन दरवर्षीच्या तुलनेत खूपच कमी आणि उशिरा येत आहे.
दरम्यान, काही व्यापारी व दलालांकडून आखाती युद्धाचे कारण पुढे करून आंब्याचे दर पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे. मार्च अखेरीस आंबा बाजारात दाखल होऊ लागला असला तरी निर्यात बाजारावर युद्धाचे ढग कायम आहेत.
कोकणातून दरवर्षी सुमारे दोन ते अडीच हजार मेट्रिक टन हापूसची निर्यात केली जाते. सध्या बाजारावर त्याचा मोठा परिणाम जाणवत नसला तरी परिस्थिती लांबल्यास निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्यात बंद राहिल्यास स्थानिक बाजारात दर घसरण्याची भीती असून, आधीच उत्पादन घटल्याने नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवू शकते.
याबाबत आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील म्हणाले, “यंदा कोकणात हापूसचे उत्पादन तुलनेत खूपच कमी आहे. आखाती देशात जाणारा आंबा दुय्यम प्रतीचा असतो, तर दर्जेदार आंबा युरोप व अमेरिकेत जातो.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आवक वाढेल. मात्र तोपर्यंत युद्धस्थिती कायम राहिल्यास आखातातील निर्यातीवर परिणाम होणारच. इतर बाजारपेठांमध्ये आंबा पाठवण्यात मात्र अडचण येणार नाही.”एकूणच, यंदा कोकणातील हापूस उत्पादकांना अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असून बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)