
छत्रपती संभाजीनगर, 01 एप्रिल, (हिं.स.)। जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी येथे पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तब्बल ११ पर्यटक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांतील ही पाचवी घटना असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेणी क्रमांक १० जवळील मोहळातून मधमाशा अचानक बाहेर पडून पर्यटकांवर तुटून पडल्या. या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. त्यानंतर तासाभरानंतर लेणी क्रमांक २६ जवळ पुन्हा मधमाशांनी हल्ला चढवला. या दुसऱ्या घटनेतही पर्यटकांना चावे बसल्याने एकूण जखमींची संख्या ११ वर पोहोचली. या सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिला आणि लहान मुलांनाही या हल्ल्यांचा फटका बसत असल्याने प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून मधमाशांच्या मोहळांबाबत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही आता जोर धरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis