आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी - जैन मूनी निलेशचंद्र
मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्रात सध्या आचार्य नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जैन समाजातीलच मूनी निलेशचंद्र यांनी आक्रमक भूमिका घेत आचार्य नयन पद्मसागर यांनी
Acharya Nayan Padmasagar  Jain Muni Nileshchandra


मुंबई, 01 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्रात सध्या आचार्य नयन पद्मसागर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जैन समाजातीलच मूनी निलेशचंद्र यांनी आक्रमक भूमिका घेत आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी केली आहे. महाराणी ताराराणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद चिघळला आहे.

आचार्य नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी या जैन समाजातील होत्या, असे वक्तव्य केले होते. या विधानावर तीव्र आक्षेप घेत मूनी निलेशचंद्र यांनी हे पूर्णपणे चुकीचे असून इतिहासाचे विकृतीकरण असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, महाराणी ताराराणी या मराठा योद्धा होत्या आणि त्यांचा जैन धर्माशी कोणताही संबंध नव्हता. इतिहासानुसार त्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी मोठा लढा दिला. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांनी तब्बल २५ वर्षे औरंगजेबाशी संघर्ष करत स्वराज्य टिकवून ठेवले.

मूनी निलेशचंद्र यांनी आचार्य नयन पद्मसागर यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले की, अशा प्रकारचे विधान करून त्यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी पुढे असेही म्हटले की, महावीर जयंतीसारख्या धार्मिक दिवशी मराठा इतिहासाचा चुकीचा संदर्भ देण्याची गरज नव्हती. यामागे मराठी आणि मारवाडी समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.

या वादात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचेही नाव घेत मूनी निलेशचंद्र यांनी त्यांच्यावरही टीका केली. मराठी-मारवाडी वाद पेटवण्यासाठी काही जण राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या वादासाठीही त्यांनी आचार्य नयन पद्मसागर आणि मंगलप्रभात लोढा यांना जबाबदार धरले.

‘एकनाथ शिंदे तुम्ही त्या कार्यक्रमात होता’

“नयन पद्मसागर वादग्रस्त बोलतो. मराठी-मारवाडी यांच्यात भांडण लावतो. शाकाहारी-मांसाहारी याबद्दल बोलतो. मी जैन समाजाला आवाहन करतो 52 कबुतर खाने बंद झाले, हे बंद होण्यामागचं कारण नयन पद्मसागर आहे. त्यांना सहकार्य करणारे मंत्री आहेत. महावीर जयंतीच्या दिवशी एकनाथ शिंदे ठाणे टेंभीनाका येथे येतात. एकनाथ शिंदे त्या महावीर जंयतीच्या कार्यक्रमात होते. तिथे पद्मसागर यांनी हे वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही साताऱ्याचे आहात. ताराराणींचा अपमान करणाऱ्या अशी जैन मुनीवर काय कारवाई करणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे” असं निलेश चंद्र म्हणाले.

दरम्यान, आचार्य नयन पद्मसागर यांनी केलेल्या वक्तव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुतीही केली होती. त्यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला असून त्यांनी राम मंदिर उभारून हिंदूंना मोठी भेट दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळेही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले असून इतिहास, धर्म आणि राजकारण या तिन्ही मुद्द्यांवरून वाद अधिकच तीव्र होताना दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande