
लातूर, 01 एप्रिल, (हिं.स.) - जिल्ह्यातील दिव्यांग बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मेंदुविकारांवर मोफत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ५ एप्रिल २०२६ रोजी (रविवार) प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव येथे होणार आहे.
जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत असून, जि.प.च्या ५ टक्के दिव्यांग राखीव निधीतून सन २०२५-२६ या वर्षासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या शिबिराचे आयोजन आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद लातूर तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. शिबिरात मेंदुविकार तज्ञ डॉक्टरांकडून दिव्यांग बालकांची सखोल तपासणी, आवश्यक उपचार आणि मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत.
अहमदपूर, उदगीर आणि चाकूर परिसरातील मेंदुविकार असलेल्या दिव्यांग बालकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रसारमाध्यमांतून प्रसिध्दी देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis