अमरावतीत केरोसीन पुरवठ्यात मोठी कपात; ग्राहकांना फक्त ३५० मिली वाटप
अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.) – गॅस सिलिंडरच्या टंचाईनंतर आता अमरावती जिल्ह्यात केरोसीन पुरवठ्यातही मोठी कपात करण्यात आली आहे. पात्र ग्राहकांना एक लिटरऐवजी केवळ ३५० मिली केरोसीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांसमोर अडचणी वाढण्याची
आता केरोसीन पुरवठ्यातही कपात ग्राहकांना मिळणार एक लिटर एेवजी ३६५ मिली लिटर


अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.) – गॅस सिलिंडरच्या टंचाईनंतर आता अमरावती जिल्ह्यात केरोसीन पुरवठ्यातही मोठी कपात करण्यात आली आहे. पात्र ग्राहकांना एक लिटरऐवजी केवळ ३५० मिली केरोसीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यासाठी यापूर्वी ३६५ किलो लिटर केरोसीनची मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र, उपलब्धतेअभावी केवळ १०८ किलो लिटर साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वितरणात प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असून आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भाग, पारधी बेडे आणि बंजारा तांडे येथील लाभार्थ्यांना प्रथम केरोसीन दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित ग्रामीण भागातील ग्राहकांना पुरवठा केला जाणार आहे.

आखाती देशांतील युद्धांमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिनाभरापासून गॅस सिलिंडरच्या टंचाईचा सामना नागरिकांसह व्यावसायिकांनाही करावा लागत आहे. जरी सध्या सिलिंडरचा पुरवठा काही प्रमाणात वाढला असला तरी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. यामुळे शहरी भागातील ग्राहकांसाठी सिलिंडर बुकिंगची मुदत २५ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सिलिंडर उपलब्ध नसल्याने पर्याय म्हणून केरोसीन वितरणाचे धोरण राज्य शासनाने राबविले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील अंत्योदय व प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना केरोसीन वितरित करण्यात येणार आहे. मात्र, देशांतर्गत केरोसीन साठाही अपुरा असल्याने मागणीमध्ये कपात करण्यात आली आहे.

दरम्यान, केरोसीनची संभाव्य किंमत प्रति लिटर सुमारे ६५ रुपये असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, सध्या केरोसीन वितरणाची यंत्रणाही कमकुवत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात केरोसीन साठवणूक व वितरणासाठी आवश्यक साधनांची कमतरता असून, हॉकर्स व किरकोळ विक्रेत्यांमार्फत पुरवठा करण्याचे नियोजन असले तरी त्यांच्याकडेही पुरेशी सुविधा उपलब्ध नाहीत.

पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये एकूण १४९३ किरकोळ परवानाधारक विक्रेते आणि ६७ हॉकर्स कार्यरत आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत प्रभावी वितरण करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande