बीड : पिंपरी (घाटा) येथील हनुमान यात्रेला सुरुवात
बीड, 01 एप्रिल (हिं.स.) :आष्टी तालुक्यातील पिंपरी (घाटा) येथे समर्थ रामदास स्वामी यांनी प्रतिष्ठापित केलेल्या हनुमान मंदिराच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थि
बीड : पिंपरी (घाटा) येथील हनुमान यात्रेला सुरुवात


बीड, 01 एप्रिल (हिं.स.) :आष्टी तालुक्यातील पिंपरी (घाटा) येथे समर्थ रामदास स्वामी यांनी प्रतिष्ठापित केलेल्या हनुमान मंदिराच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहत आहेत.

या मंदिरातील हनुमान ‘जागृत’ मानला जात असून, येथे केलेला नवस पूर्ण होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर महिला भाविक आपल्या मुलाबाळांसह मंदिरात रांगेत दंडवत घालताना दिसतात, हे या यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.

समर्थ रामदास स्वामी यांनी या ठिकाणी हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर ग्रामदैवत म्हणून या यात्रेची परंपरा सुरू झाली. हनुमान जयंतीनिमित्त भरणाऱ्या या यात्रोत्सवाला स्थानिकांसह आसपासच्या गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले नागरिकही खास या यात्रेसाठी गावात परत येतात. तसेच सासुरवाशिणी महिला आपल्या कुटुंबासह हजेरी लावतात.

यात्रेनिमित्त गावात विविध मिठाई व खेळण्यांची दुकाने सजली असून वातावरणात उत्सवी रंग भरले आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी गंगाजलाने अभिषेक करण्यात येतो.

याशिवाय छबिना मिरवणूक ही भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून महिलांची मोठी उपस्थिती यामध्ये दिसून येते.

यात्रेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कुस्ती आखाडा. या आखाड्यात पुणे, नगर, बीड, करमाळा, मगरास, लिंबगाव आदी ठिकाणांहून नामांकित मल्ल सहभागी होत आहेत. विजेत्या मल्लांना बक्षिसे देण्यात येत असल्याने कुस्तीप्रेमींचीही मोठी गर्दी होत आहे.

एकूणच, धार्मिक परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम असलेली पिंपरी (घाटा) येथील हनुमान यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande