
लातूर, 01 एप्रिल, (हिं.स.) - औसा येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय मंडळ प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी पक्षासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला आमदार अभिमन्यू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते व महिला-पुरुष बांधवांचे आभार मानत बसवराज पाटील यांनी सांगितले की, अशा प्रशिक्षण शिबिरांमुळे कार्यकत्यांमध्ये सकारात्मक विचार निर्माण होतात. आपण कसे वागावे, कसे काम करावे आणि समाजासाठी काय योगदान द्यावे, याचा
सातत्याने विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय व प्रांतिक नेतृत्वाचे आभार मानले. देशभरात राबविण्यात येत असलेल्या या महाअभियानातून कार्यकत्यांना पक्षाचे धोरण, विचारधारा आणि भविष्यातील दिशा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षाच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी काय करता येईल, देशाच्या विकासात आपले योगदान कसे वाढवता येईल, यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असून, देशातील जवळपास प्रत्येक राज्यात पक्षाची ताकद वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातही पक्षाने विविध योजनांच्या माध्यमातून मोठे काम केले असून, हे काम कार्यकत्यांनी लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पक्ष आपल्यासाठी काय करतो याबरोबरच आपण पक्षासाठी काय करतो, याचाही विचार कार्यकत्यांनी करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून कार्यकत्यांना नवीन दिशा मिळेल आणि ते अधिक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
औसा तालुका मराठवाड्यातील एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या दृष्टीने पक्षाची तळमळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले. देश प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, हे धोरण स्वीकारून देश बळकट करण्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांनुसार कार्यकत्यांनी देशसेवेसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षण केंद्रात शेकडो कार्यकर्ते मुक्कामी राहून प्रशिक्षण घेत असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमातून भविष्यात हजारो कार्यकर्ते घडतील, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis