
रायगड, 01 एप्रिल (हिं.स.) व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे रायगड जिल्ह्यातील हॉटेल व खानावळींना चुलीचा आधार घ्यावा लागत असताना, या प्रश्नावरून आता राजकीय वातावरणही तापले आहे. एकीकडे व्यावसायिकांना गॅसअभावी व्यवसाय सांभाळणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिलेंडर पुरवठा विस्कळीत झाल्याने व्यावसायिक सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. परिणामी अनेक खानावळी आठवड्यातून केवळ तीन-चार दिवसच सुरू ठेवाव्या लागत आहेत. पर्यटकांची मोठी वर्दळ असलेल्या रायगडमध्ये या परिस्थितीचा थेट परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होत आहे.
विरोधी पक्षांनी या टंचाईसाठी केंद्र व राज्य सरकारच्या नियोजनाच्या अभावाला जबाबदार धरत तीव्र टीका केली आहे. “सामान्य नागरिकांपासून ते लघु व्यावसायिकांपर्यंत सर्वजण त्रस्त आहेत, तरीही सरकारकडून ठोस उपाययोजना दिसत नाहीत,” असा आरोप विरोधकांनी केला आहे.
तर सत्ताधाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगत परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, असा दावा केला आहे. “परिस्थिती तात्पुरती असून पुरवठा साखळी सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गॅसअभावी अनेक हॉटेल व्यावसायिकांना चुली व स्टोव्हचा वापर करावा लागत आहे. “इतक्या वर्षांच्या व्यवसायात प्रथमच चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय,” अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली.
सिलेंडर टंचाईमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे एकीकडे नागरिक व व्यावसायिक त्रस्त असताना, दुसरीकडे त्याचे राजकारण रंगू लागल्याने प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा बनत असल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)