राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.) : राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणकप्रणालीद्वारे अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी
राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ


सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.) : राज्यशासनाच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन संगणकप्रणालीद्वारे अर्ज करण्याची मुदत आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि कृषी विस्तारकांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाइन स्वरूपात असल्याने शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या चार प्रती तयार करण्यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागत असे. ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सरकारने यंदापासून स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे.

ऑनलाइन प्रणालीचे हे पहिलेच वर्ष असल्याने तसेच अर्जासोबत जोडवा लागणारा 'जिल्हा पोलीस अधीक्षकांचा चारित्र्य पडताळणी दाखला' मिळविण्यासाठी लागणारा कालावधी पाहता क्षेत्रीय स्तरावरून शेतकऱ्यांनी केलेली मागणी विचारात घेऊन, कृषी विभागाने ही मुदत १५ दिवसांनी वाढवून दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती.

पुरस्कारांसाठी इच्छुक उमेदवारांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in जाऊन 'कृषी पुरस्कार' या टॅबवर आपले प्रस्ताव सादर करायचे आहेत. या डिजिटल प्रणालीमुळे मूल्यांकन आणि अहवाल निर्मितीची प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होणार आहे. पात्र शेतकरी आणि संस्थांनी या वाढीव संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande