
बीड, 01 एप्रिल (हिं.स.)।
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणे तसेच मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने 'आनंदी वाचनपेटी' हा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गेवराई तालुक्यातील उमापूर (जि.प. माध्यमिक शाळा) व ठाकरवाडी (जि.प. प्रा. शाळा) येथील शाळांच्या ग्रंथालयांना प्रत्येकी १११ पुस्तकांची 'आनंदी वाचनपेटी' प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. पवन सत्यनारायण चांडक, वाचन चळवळ समन्वयक प्रकाश डुबे, भगवान फुंदे, किरण गायकवाड, उमापुर शाळेचे मुख्याध्यापक मनोजकुमार ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते.
ही वाचनपेटी हार्दिक भरतकुमार ठाकर यांच्या दातृत्वातून लोकसहभागाच्या माध्यमातून प्रदान करण्यात आली. समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविला. या 'आनंदी वाचनपेटी' मध्ये कथा, कविता संग्रह, महापुरुष व शास्त्रज्ञांची चरित्रे तसेच विविध विषयांवरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तके समाविष्ट असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अति वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवून दररोज वाचनाची सवय लावावी, तसेच वाचलेले लिहिणे व व्यक्त करण्याची सवय विकसित करावी, असे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis