

ठाणे, 01 एप्रिल (हिं.स.)। गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस डी आर्ट्स निर्मित ‘संगीत रामायण (हिंदी)’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम रामनवमीच्या पावन निमित्ताने राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महर्षी वाल्मीकी यांच्या अमर काव्यावर आधारित या कार्यक्रमाने प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध प्रसंग, आदर्श आणि मूल्ये सुरेल, भावपूर्ण आणि देखण्या पद्धतीने रसिकांसमोर उलगडली.
या विशेष सादरीकरणाचे संगीत दिग्दर्शन विदुषी आशा खाडिलकर यांनी केले होते, तर गीत रचना सुनील सुधाकर देशपांडे यांची होती. संगीत आणि शब्द यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. वेदश्री ओक, केतकी चैतन्य, डॉ. राम पंडित आणि आमोद दातार यांनी आपल्या सुमधुर गायनाने कार्यक्रमाला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. कार्यक्रमाचे निवेदन कौस्तुभ दिवाण यांनी ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केले.
कार्यक्रमातील उत्कृष्ट वाद्यवृंदाबरोबरच कल्पिता राणे यांच्या नृत्य सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा अधिक खुलवली. त्यांच्या सादरीकरणामुळे रामकथेतील भावविश्व अधिक जिवंत आणि दृश्यरम्य पद्धतीने प्रेक्षकांसमोर उभे राहिले. संगीत, निवेदन, नृत्य आणि एकूण मांडणी यांचा सुंदर समतोल साधल्यामुळे हा कार्यक्रम रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
या कार्यक्रमाला खासदार विनयजी सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, माजी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, पद्मविभूषण एम. एम. शर्मा, पद्मश्री जी. डी. यादव, पद्मश्री अनिरुद्ध पंडित, सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी, पंडित राम देशपांडे, डॉ. श्रीखंडे, कर्नल सावंत, वांद्रे पूर्व संगीतसभेचे गौतम डोंगरे, सांस्कृतिक संवर्धन प्रतिष्ठानचे मोहन साळेकर, भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमानंतर अनेक रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करत “अशा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे,” असे मत नोंदवले. या सांस्कृतिक उपक्रमास पीस्क्वेअर एज्यूस्पोर्ट्स फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule