
रायगड, 01 एप्रिल (हिं.स.)।बांबु व पारंपरिक हस्तकलेला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत बांबू व्यावसायिकांना स्टूल कीटचे वाटप केले. अलिबाग तालुक्यातील 50 बांबू कारागिरांना अत्यावश्यक साधनांनी सुसज्ज असे कीट जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या स्टूल कीटमध्ये कटर, ड्रिल मशीनसह विविध आवश्यक साहित्यांचा समावेश असून यामुळे कारागिरांचे काम अधिक सुलभ आणि दर्जेदार होणार आहे. बांबू हा पर्यावरणपूरक व्यवसाय असून त्याच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतात. या व्यवसायाच्या वृद्धीसाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी हरालय्या, वरिष्ठ सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंग, व्यवस्थापक स्वप्ना राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय हस्तकला विकास कार्यक्रमांतर्गत आयुक्त हस्तकला कार्यालय, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार आणि महाराष्ट्र स्टेट हॅन्डलूम फेडरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. नागाव, थळ, पोयनाड, रेवस, साळाव आणि रेवदंडा येथील लाभार्थ्यांना या कीटचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि नेहा भोसले यांनी मार्गदर्शन करताना बांबू व्यवसाय अधिक विकसित करण्यासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे स्थानिक कारागिरांना मोठा आधार मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)