ठाणे जिल्ह्यात पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत 1 हजार 332 रुग्णांना सेवा
ठाणे, 01 एप्रिल (हिं.स.)। राज्य शासनाच्या पॅलिएटिव्ह केअर (उपशामक काळजी) कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना त्यांच्या घरपोच आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे रुग्
ठाणे जिल्ह्यात पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत 1 हजार 332 रुग्णांना सेवा


ठाणे, 01 एप्रिल (हिं.स.)। राज्य शासनाच्या पॅलिएटिव्ह केअर (उपशामक काळजी) कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना त्यांच्या घरपोच आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे रुग्णांना वेदनामुक्त व सन्मानाने जीवन जगण्यासाठी मोठा आधार मिळत आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार, एकूण 1 हजार 332 रुग्ण पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत समाविष्ट असून आरोग्य पथकांकडून 1 हजार 318 घरभेटी देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या स्थितीनुसार नियमित तपासणी व समुपदेशन करण्यात येत आहे.

तसेच 347 रुग्णांना मध्यम ते तीव्र वेदना असल्याचे निदर्शनास आले असून त्यावर आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. कर्करोगग्रस्त 127 रुग्णांना विशेष सेवा देण्यात आली असून इतर आजार असलेल्या 497 रुग्णांनाही या योजनेचा लाभ मिळाला आहे.

तालुकानिहाय पाहता, अंबरनाथ (542), भिवंडी (286), मुरबाड (196), शाहापूर (206) व कल्याण (102) या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा पुरविण्यात आल्या आहेत. विशेषतः घरभेटींच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहोचून उपचार देण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे पॅलिएटिव्ह केअर रुग्णांकरिता खाटांची व्यवस्था तसेच बाह्यरुग्ण विभागात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्या माध्यमातून रुग्णांची नियमित तपासणी, औषधोपचार, समुपदेशन व कुटुंबियांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या पुढाकारातून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या घरच्या घरीच आवश्यक उपचार, मानसिक आधार व समुपदेशन मिळत असून आरोग्य व्यवस्थेचा मानवी चेहरा अधिक बळकट होत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande