धर्मदाय पाणपोईंची संख्या घटली; रांजण विक्रीवर परिणाम, माठांच्या खरेदीला जोर
अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.) उन्हाळ्याची चाहूल लागताच पूर्वी शहरातील अनेक ठिकाणी धर्मदाय पाणपोई उभारून नागरिकांना थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात असे. या पाणपोईंमध्ये मातीच्या रांजणांचा वापर करून वाटसरूंना तप्त उन्हात गार पाणी दिले जायचे.
धर्मदाय पाणपोईंची संख्या घटली; रांजण विक्रीवर परिणाम, माठांच्या खरेदीला जोर


अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.)

उन्हाळ्याची चाहूल लागताच पूर्वी शहरातील अनेक ठिकाणी धर्मदाय पाणपोई उभारून नागरिकांना थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात असे. या पाणपोईंमध्ये मातीच्या रांजणांचा वापर करून वाटसरूंना तप्त उन्हात गार पाणी दिले जायचे. मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे आणि बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांमुळे अशा पाणपोईंची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी रांजण विक्रीवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे.दुसरीकडे, घरोघरी पिण्याच्या पाण्यासाठी माठाला मात्र मोठी मागणी वाढताना दिसत आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा चटका अधिक जाणवू लागणार असून तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या थंड पाणी मिळण्यासाठी अनेकजण मातीच्या माठाला प्राधान्य देत आहेत. बाजारात माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.घशाला कोरड पडल्यावर माठातील थंड पाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते, अशी धारणा नागरिकांमध्ये आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. नक्षीदार रंगीत माठांचा दर साधारणपणे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत आहे, तर साध्या काव्या रंगाचे माठ १८० ते २१० रुपयांपर्यंत मिळत आहेत. मातीचे रांजण ६०० ते ७०० रुपयांदरम्यान विकले जात आहेत.माठाला ‘गरीबांचा फ्रिज’ अशीही उपमा दिली जाते. मातीचे माठ सच्छिद्र असल्याने त्यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. हे पाणी आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते आणि चवीला नैसर्गिक गार असते. सध्या बाजारात साध्या माठांसोबतच नक्षीदार, नळ बसवलेले माठ आणि मातीचे रांजणही उपलब्ध आहेत.दरम्यान, माठ तयार करण्यासाठी लागणारी माती आणि भुसा यांचे दर वाढल्यामुळे माठांच्या किमतीत सुमारे २० ते २२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तरीही वाढत्या उन्हामुळे माठ खरेदीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.त्याचवेळी सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी शहरातील विविध भागात उभारल्या जाणाऱ्या पाणपोईंची परंपरा हळूहळू कमी होत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande