नगरपंचायतीच्या प्रस्तावाला तीन वर्षांची प्रतीक्षा
प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिकांत नाराजी अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.) । अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, देवमाळी तसेच चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी आणि घाटलाडकी या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव गेल
नगरपंचायतचा प्रस्ताव अडकला लालफितीत पथ्रोटसह चांदूरबाजार तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा होता समावेश


प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिकांत नाराजी

अमरावती, 01 एप्रिल (हिं.स.) । अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, देवमाळी तसेच चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी आणि घाटलाडकी या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप कोणताही शासकीय आदेश जारी झालेला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मंत्रालयाच्या लालफीतशाहीत अडकला असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगू लागली आहे.

लोकसंख्या वाढलेल्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन होता. त्यानुसार पथ्रोट ग्रामपंचायतने 24 मार्च 2023 रोजी मंत्रालयाकडे आवश्यक प्रस्ताव सादर केला होता. 2011 च्या जनगणनेनुसार पथ्रोटची लोकसंख्या 15 हजार 693 असून रोजगाराचे प्रमाण सुमारे 15 टक्के असल्यामुळे स्वतंत्र नगरपंचायत स्थापन करण्यास हरकत नसल्याचे मत मांडण्यात आले होते.

यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित ग्रामपंचायतींच्या रूपांतराबाबत चर्चा होऊन निर्णय झाल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. तसेच, संबंधित ग्रामपंचायतींचे ठराव सचिवांमार्फत मंत्रालयात पाठविण्यात आले होते.

मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही अद्याप कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही झालेली नाही. सध्या संबंधित ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून प्रशासक राजवट लागू आहे, तरीही प्रस्तावाबाबत कोणतीही गती दिसून येत नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

दरम्यान, नगरपंचायत होण्याच्या अपेक्षेवर असलेल्या इच्छुकांना आता आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नगरसेवकाऐवजी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच पदासाठीच प्रयत्न करावे लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande