
सोलापूर, 01 एप्रिल (हिं.स.) : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एका माजी आमदारांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या संदर्भात गौप्यस्फोट केला आहे.
अंधारे यांनी दावा केला की, अशोक खरात नावाच्या व्यक्तीस पूजेसाठी गावात आणण्यात आले होते. तसेच, सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचे खरात यांच्यासोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. पुढे त्यांनी असेही म्हटले की, खरात यांच्या मुलीला साळुंखे-पाटील यांनी सुमारे ३२ ते ३४ लाख रुपयांचा फ्लॅट ‘गिफ्ट डीड’द्वारे दिला आहे.
अंधारे यांच्या मते, या प्रकरणाचे धागेदोरे सांगोल्यात मिळू शकतात. त्या म्हणाल्या की, अशोक खरात आणि इतर काही व्यक्ती पूजेसाठी सांगोल्यात आले होते, तसेच विविध ठिकाणी झालेल्या पूजांमध्ये काही राजकीय व्यक्तींची उपस्थिती होती. या सर्व घडामोडींमागे खरात यांचे प्रस्थ वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणातील सर्व पुरावे आपल्याकडे असून, ते संबंधित यंत्रणांना देण्यास आपण तयार असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. तसेच, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे सांगोला तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून, संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
-----------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड