
मुंबई, 01 एप्रिल, (हिं.स.)। सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या ताराराणी यांच्याबद्दल जैन मुनींनी केलेल्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे पुरावे संजय राऊतांनी मागितले होते. छत्रपती शिवरायांच्या वंशजांचे पुरावे मागितल्याबद्दल संजय राऊतांनी जाहीर माफी मागावी आणि मगच मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासावर बोलावे असा घणाघात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.
बन यांनी सांगितले की, संजय राऊत, तुम्ही कधीच धर्मांतर केले आहे. म्हणूनच राऊत यांनी विनाकारण हिंदू धर्म, महाराष्ट्र धर्म आणि मराठा धर्माबद्दल बोलू नये. सत्तेसाठी औरंगजेबाचा धर्म स्वीकारणाऱ्यांनी धर्मांतर आणि धर्माच्या गोष्टी करू नयेत. तो अधिकार त्यांनी कधीच गमावलेला आहे.
महाराष्ट्र सरकार षंढ नाही. संजय राऊत हे षंढ आहेत अशा शब्दात वाभाडे काढत श्री. बन यांनी महाराष्ट्र राज्य हे देवाभाऊंच्या नेतृत्वात पुढे जात असून अशा पद्धतीने जो भडक वक्तव्य करेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे ठणकावून सांगितले. संजय राऊत जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत. उबाठा गटाला त्याची जागा दाखवण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत केल्याने खऱ्या अर्थाने षंढ कोण आहे याचा दाखला महाराष्ट्राने दिल्याचे बन म्हणाले.
भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित आहे. पण संजय राऊत तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास ठाऊक आहे का ते आधी सांगा. मंगल प्रभात लोढा यांनी राऊतांसारखा पत्राचाळीमध्ये घोटाळा केला नाही. त्यांनी मराठी माणसांची घरे लुटून स्वतःचे घर भरले नाही. त्यांना शंभर दिवसाचा तुरुंगवास झाला नाही. मराठी माणसांची घरे लुटायची. पत्रा चाळीमध्ये घोटाळा करायचा हा ज्यांचा इतिहास आहे त्या संजय राऊत यांनी आधी स्वतःचा इतिहास बघावा, अशा शब्दात बन यांनी राऊत यांना फटकारले.
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार ठेकेदारांचे नाही तर जनतेचे सरकार आहे, असे ठणकावून सांगतानाच आम्ही ठेकेदारी करतो ती जनतेची करतो. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठेकेदार हे सरकार चालवायचे. कोरोना काळात महाविकास आघाडीच्या लोकांनी कोट्यवधी कमावले. संजय राऊतांनी खिचडी आणि कफन चोरीमध्येही घोटाळा केला. या दलालीमुळेच राऊतांनी तुरुंगवासही भोगला होता हे जरा ध्यानात ठेवा, असेही बन यांनी सुनावले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर